यंदाच्या वर्षातील अखेरचा महिना सुरू झाला असून आतापासून सर्वांना नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने ठिक-ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये खास आकर्षण असे ते बॉलिवूड कलाकारांचे. अनेकांमध्ये त्यांची तासाभराची हजेरी आणखी उत्साह निर्माण करुन जाते. पण एका तासाच्या हजेरीसाठी हेच कलाकार कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एक तास हजेरी लावण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला किती रक्कम घेणार हे समोर आले आहे.
उर्वशी रौतेला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजीत केलेल्या एका पार्टीमध्ये हजेरी लावणार आहे. या पार्टीमध्ये 1 तास ती डान्स करणार असून ती त्यासाठी तब्बल 3 कोटी रुपये मानधन घेणार असल्याचे वृत्त आहे. “डॅडी मम्मी’, “हसीनों का दीवाना’ आणि “पागलपंती’ या गाण्यावर ती डान्स करणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, उर्वशीचा “पागलपंती’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. पण बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई या चित्रपटाने केली नाही. उर्वशी आता लवकरच एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशी गणेशन करत आहेत.