पुणे – सध्या चित्रपट प्रेमींसाठी एक मोठी खुशखबर आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने होणार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ चित्रपट महोत्सवाची घोषणा झाली आली आहे. दरवर्षी चित्रपट प्रेमी या महोत्सवाची आतुरतेने वाट पहात असतात. यावर्षी हा कार्यक्रम ९ ते १६ जानेवारी २०२० मध्ये होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी जब्बार पटेल म्हणाले, ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’ असून या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव चित्रपट रसिकांसाठी उत्तम मेजवाणी ठरणार आहे. पुण्यात ४ ठिकाणी ८ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहे. तसेच, यंदा एफटीआयआयला ६० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने महोत्सवा अंतर्गत अनेक नवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे’. असं ते म्हणाले.