मुलीचे प्रेमसंबंध मंजूर नसल्याने जन्मदात्यानेच केली हत्या

मुंबई: आपल्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर दोघा अज्ञातांनी मुंडके छाटलेला 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह फेकून पळ काढला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

दोन दिवसांपूर्वी पहाटे कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर दोघे अज्ञात तरुण संशयितरित्या काळ्या रंगाची सुटकेस घेऊन जात होते. या सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्याने, त्याठिकाणी उभा असलेल्या रिक्षाचालकांनी सुटकेसमध्ये काय आहे, असे विचारताच हे दोघेजण सुटकेस तिथेच टाकून पळाले.

यानंतर रिक्षाचालकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुटकेस उघडली असता एका प्लास्टिक पिशवीत मृत महिलेचा कमरेखालचा भाग आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून या मृत महिलेच्या कमरेखालचा भाग विच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेला.

हा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासात संशयाची सुई या तरुणीच्या वडिलांकडे फिरली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता, नराधम बापाला आपल्या मुलीचे प्रेम संबंध मान्य नसल्याने त्यानेच मुलीची घरात हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या धडापासून मुंडके वेगळे केले. हे मुंडके टिटवाळ्यात फेकले आणि कंबरेखालचा भाग सुटकेसमध्ये घालून कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर फेकला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.