निसर्गाने साथ दिल्याने तालुक्यातील चारा, पाणीटंचाई दूर
राजगुरूनगर – खेड तालुका दुग्ध व्यवसायात पुढे आहे. मात्र, गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे विकली होती. मात्र, यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने चाराटंचाई आणि पाण्याचा प्रश्न दूर झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी दुभती जनावरे, शेतीकामासाठी बैलांची खरेदी केली आहे.
खेड तालुक्यात राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेच्या 37 दवाखान्यातून 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत लाळ खुरकूत या जनावरांच्या आजाराची लसीकरण मोहीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील 37 दवाखान्यांतून 96 हजार 700 पशुधनाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी 96 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे.
तालुक्यात राज्यस्तरीय 13 व जिल्हा परिषदेचे 24 पशुवैवैद्यकीय दवाखाने आहेत.
चाकण, वाडा, दोंदे, येलवाडी, बुट्टेवाडी, बहुळ, शिवे, वाकी, धामणगाव, तोरणे साकुर्डी, टोकावडे, कळस, वसुली बुरसेवाडी या गावांमध्ये सर्वांच्या सर्वच दुभत्या जनावरांचे लाळ खरकुत रोगाचे लसीकरण केले आहे. तालुक्यात सध्या पाईट परिसरात सर्वाधिक पशुधन आहे. तालुक्यात 37 डॉक्टरांच्या मदतीने जनावरांवर उपचार केले जात आहेत.
सध्या तीन लाख लिटरपर्यंत उत्पादन
खेड तालुक्यात सध्या सुमारे तीन लाख लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन होत आहे. दुष्काळ हटल्याने यात आता वाढ होणार आहे. तालुक्यात दूध व्यवसायात सर्वाधिक गायीची संख्या आहे. त्यापाठोपाठ म्हशींची सांख्य आहे, तर शेळ्यांची संख्या वाढत आहे. तालुक्यात यावर्षी चांगला चारा, पाणी उपलब्ध असल्याने दुधात वाढ होणार आहे. कात्रज आणि खासगी संस्था दूध संकलन करीत आहेत.
राज्य शासन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून तालुक्यात दुभत्या जनावरांना लाळ खुरकूत रोग नियंत्रण लसीकरण कार्यक्रमाचे महिनाभर आयोजन करण्यात आले होते. तालुक्याला 96 हजार जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते पूर्ण केले आहे. दुभत्या जनावरांना लाळ खुरकूत लसीकरण केले नाही, तर त्याचा दुभत्या जनावरांवर मोठा परिणाम होतो त्यांचे प्रजनन थांबते, दुधावर परिणाम होतो. तालुक्यात जनावरांच्या विविध आजारांवरील लसीकरण कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. तालुक्यात 37 डॉक्टरांच्या माध्यमातून तालुक्यातील पशुधनाचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे प्रयत्न आहे याबरोबरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
– डॉ. कैलास कोहिणकर, पशुवैद्यकीय अधिकारी, खेड तालुका
- नोंदणी झालेल्या जनावरांची संख्या
- गायी: 17 हजार 443
- म्हशी: 31 हजार 350
- संकरित गायी: 54 हजार 655
- एकूण: 1 लाख 3 हजार 448