बॉलिवुडमधील खिलाडी अर्थात अक्षय कुमारच्या “केसरी’, “मिशन मंगल’ आणि “हाउसफुल-4′ यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार प्रदर्शन केले आहे. आता पुढील “गुड न्यूज’ चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या “सुर्यवंशी’ चित्रपटाचे शूटिंगही करत असताना अक्षयने आता आपल्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याने “दुर्गावती’ची घोषणा केली आहे. यात अभिनेत्री भूमि पेडणेकर मुख्य भूमिका साकारत आहे.
अक्षय कुमार याने एक खास फोटोसोबत या चित्रपटाची गोड बातमी आपल्य चाहत्यांना दिली. या फोटोत अक्षय कुमार आणि भूमि पेडणेकरशिवाय चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक प्लाकार्ड घेवून दिसत आहेत. “दुर्गावती’ चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोक करणार असून भूषण कुमार हे निर्मिती करणार आहेत.
दरम्यान, भूमि पेडणेकरनेही इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून ती खूपच उत्साहित असल्याचे सांगितले आहे. तसेच भूमिचा आगामी “पति, पत्नी और वो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन झळकणार आहेत.