गतवर्षीपेक्षा 116 कोटींनी अधिक उत्पन्न : स्वतंत्र मोहिमांमुळे यश
पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाने शुक्रवारी 1 हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा पार केला. मागील वर्षी याच दिवशी 884 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा मिळलेले हे उत्पन्न गतवर्षीपेक्षा सुमारे 116 कोटींनी अधिक असल्याची माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली. तसेच, यावर्षी जास्तीत जास्त कर वसुलीसाठी स्वतंत्र मोहीम राबवण्यात येत असून मार्च 2020 अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसुली करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
राज्य शासनाकडून 2017 मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर मिळकतकर हे महापालिकेचे उत्पन्नाचे स्वत:चे एकमेव साधन आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरात मिळकतकर वसुलीकडे अधिकाधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे या विभागास 2019-20 च्या अंदाजपत्रकात सुमारे 2,100 कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट दिले आहे, तर त्यात सुमारे 1,400 कोटींची या वर्षीची मागणी असून जवळपास 600 कोटींच्या थकबाकीच्या वसुलीचे उदिष्ट देण्यात आले आहे, त्यासाठी प्रशासनाकडून या महिन्यापासून बॅंड तसेच पथके स्थापन करून वसुली केली आहे. त्यामुळे 1 मार्च ते नोव्हेंबर 2019 अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत तब्बल 1 हजार कोटींच्या उत्पन्नाचा भरणा झाला आहे.
धनादेश आणि ऑनलाइन व्यवहारांवर भर
मिळकतकर भरण्यात धनादेश तसेच ऑनलाइन स्वरुपात कर भरण्यास पुणेकरांची पसंती असल्याचे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे. 408 कोटी ऑनलाइन स्वरुपात, 452 कोटी धनादेशाच्या स्वरुपात तर, 137 कोटी रोख रक्कमेच्या स्वरुपात महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत, तर ही सर्वाधिक 3 लाख 54 हजार मिळकतधारकांनी आपला कर ऑनलाइन स्वरुपात भरला आहे. तर 2 लाख 16 हजार मिळकतधारकांनी रोख रक्कमेच्या स्वरुपात कर जमा केला आहे.