बॉलिवुडमधील यशस्वी संगीतकार म्हणून ओळख असलेले जतिन आणि ललित पंडित पुन्हा एकदा एकत्रित येणार असण्याची शक्यता आहे. या दोन्ही भावांनी “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, “जो जीता वही सिकंदर’, “यस बॉस’, “कुछ कुछ होता है’, “जब प्यार किसी से होता है’ आणि “प्यार तो होना ही था’ यासारख्या चित्रपटात सदाबहार संगीत दिले आहे. 90च्या दशकानंतर या जोडीने “कभी खुशी कभी गम’ आणि “हम तुम’ यासारख्या चित्रपटात दिलेले संगीत खूपच लोकप्रिय ठरले होते. परंतु या दोघांनी वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
या जोडीने आमिर खान आणि काजोल यांच्या “फना’ चित्रपटाला अखेरचे संगीत दिले होते. यानंतर हे दोघे भाऊ स्वतंत्रपणे म्यूझिक देऊ लागले. मात्र, जतिन आणि ललित पंडित हे सिंगिंग रिऍलिटी शो “इंडियन आयडल 11’च्या मंचावर एकत्रित दिसले होते. यानंतर ही जोडी पुन्हा एकत्रित येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याप्रसंगी ललित म्हणाले, आम्ही या कार्यक्रमात आमचे गाणे ऐकण्यासाठी उपस्थित राहिलो होतो आणि आम्हाला ते ऐकून आनंद झाला. तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मला जतिन यांची सतत आठवण येते आणि मोठ्या भावासोबत काम करताना मला नक्कीच आवडेल, असे त्यांनी सांगितले.