पुणे – 1 डिसेंबरपासून महामार्गावर प्रवास करताना टोल देण्यासाठी फास्टॅग नसल्यास टोल दुप्पट द्यावा लागणार आहे. मात्र, अद्यापही बरेच वाहनधारक याबाबत अनभिज्ञ आहे.
महामार्गावरील सर्व टोल प्लाझावर सर्व लेन फास्टॅगसाठी रुपांतरित करण्यात येत आहेत. त्यासाठी महामार्ग विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून टोल देण्यासाठी वाहनधारकांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही. फास्टॅग समोरच्या काचेवर असेल आणि त्यातून आवश्यक ती टोल रक्कम काढून घेतली जाणार आहे. फक्त डाव्या बाजूची लेन हायब्रीड असणार आहे. याठिकाणी फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल.
फास्टॅग लोकप्रिय करण्यासाठी महामार्गावर सध्या फास्टॅग मोफत मिळत आहेत. मात्र, ते वाहन मालकाला स्वतः रिचार्ज करावे लागते. सध्या ऍमेझॉन आणि काही बॅंकांच्या शाखांमध्ये फास्टॅग 100 रुपयाला मिळतात. मात्र, 1 डिसेंबरनंतर मोफत मिळणार नाहीत. फास्टॅग खरेदी करताना अनेक कागदपत्रे दाखवावी लागतात. त्यामध्ये वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, वाहन मालकाचा फोटो आणि केवायसी कागदपत्रांचा समावेश आहे. त्यानंतर माय फास्टॅग मोबाइल ऍपमध्ये माहिती भरून त्याला ऍक्टिव्हेट करावे लागते. त्याचबरोबर फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम राहील याची काळजी घ्यावी लागते.
…तर दुप्पट टोल आकारणी
फास्टॅगमधील रक्कम कमी झाल्यास रिचार्ज करावे लागते. मर्यादित केवायसी धारकाला फास्टॅगमध्ये 10 हजार रुपयापर्यंत तर, पूर्ण केवायसी धारकाला 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम टाकता येते. ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग, यूपीआयद्वारा दिली जाऊ शकते. सरकारने बऱ्याच दिवसापासून याबाबत वातावरण निर्मिती करूनही या नव्या व्यवस्थेला वाहनधारकांनी फारसे गंभीरपणे घेतलेले आहे, असे दिसत नाही. मात्र, मार्गावर प्रवास करताना दुप्पट टोल द्यावा लागल्यानंतर ही प्रक्रिया वेग घेईल.