शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आशादायी ट्विट
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने अतिशय वेगळे वळण घेतले आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. या सर्व प्रकारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळावेळी आपल्या सूचक ट्विटमुळे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. साधारण एका महिन्याहून अधिक काळ सातत्याने पत्रकार परिषदा घेत, माध्यमांशी संवाद साधत ठाकरी शैलीमध्ये त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदावर निवड केल्यानंतर शपथविधी सोहळ्याच्या दिवशी एक लक्षवेधी ट्विट केले आहे.
अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है
अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है
अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को
अभी तो पूरा आसमान बाकी है— Sanjay Raut (@rautsanjay61) November 27, 2019
‘अभी तो पूरा आसमान बाकी है’, असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी एका अर्थी महाराष्ट्रविकासआघाडीच्या आगामी कारकिर्दीविषयीच्या आशाच व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिलेल्या या सरकारकडून येत्या काळात कोणती धोरणं राबवण्यात येणार आणि ही आघाडी राज्याला कोणत्या प्रगतीपथावर नेणार हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, शिवसेनेचाच मुख्यमंत्री येणार असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगत, आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या राऊत यांचेही या सत्तास्थापनेत उल्लेखनीय योगदान राहिल्याचं म्हणत राऊतांनाही याचे श्रेय जात असल्याचं मत अनेकांनी मांडले आहे.