डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार काम
पुणे – पुणे मेट्रोचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाच्या कामासाठीची “टनेल बोरिंग मशीन’ अखेर पुण्यात दाखल झाले आहे. मशीनचा 80 टक्के भाग कृषी महाविद्यालय येथील खोदाई सुरू करण्याच्या शाफ्टमध्ये जोडण्यात आला आहे. तर उर्वरीत 20 टक्के भाग मंगळवारी पुण्यात दाखल होणार असून पुढील चार दिवस तो जोडण्याचे काम होणार आहे. त्यानंतर 3 किंवा 4 डिसेंबर रोजी प्रत्यक्षात भुयारी मार्गाच्या खोदाईस सुरुवात होणार आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे मशीन “टेराटेक’ कंपनीच्या चीनमधील कारखान्यातून तयार होऊन “जेएनपीटी’ मुंबई बंदरात दाखल झाले होते. त्यानंतर त्याचे सुटेभाग वेगवेगळ्या कंटेनरमधून पुण्याकडे रवाना करण्यात आले होते. हे कंटेनर गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात येत असून हे साहित्य आल्यानंतर ते तातडींन जोडण्यात येत आहे. त्यानुसार, जवळपास 80 टक्के मशीन जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पात कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा 5 किमीचा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर शिवाजीनगर बसस्थानक, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई व स्वारगेट अशी स्थानके आहेत.शहराच्या अत्यंत दाट लोकवस्तीत व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना या भुयारी मेट्रो मार्गाद्वारे जोडले जाणार आहे.
“टीबीएम’ जमिनीखाली उतरवण्यासाठी लागणारे शाफ्ट (खड्डा)चे काम पूर्ण झाले आहे. या शाफ्टमधून जिथून खोदाई सुरू होणार आहे. तिथे हे मशीन जोडण्यात आले आहे. या कामासाठी मेट्रोने निवडलेली “टनेल बोरिंग मशीन’ ही “संमिश्र रॉक अर्थ प्रेशर बॅलन्स’ या प्रकारातील “टीबीएम’ असून दिल्ली मेट्रो व मुंबई मेट्रो कामांमध्ये अशाप्रकारची “टीबीएम’ यशस्वीरित्या वापरली आहेत. ही “टीबीएम’ मशीन जपान इंडस्ट्रियल स्टॅंडर्ड (जेआयएस) व ऑस्ट्रेलियन स्टॅंडर्ड (एएस) या मानांकनावर आधारलेले आहे. या “टीबीएम’चा व्यास 6.5 मी असून लांबी 120 मी लांबी असणार आहे. त्याद्वारे ही खोदाई केली जाणार आहे.