माणिकडोह बिबट्या रेस्क्यू टीमची कामगिरी
जुन्नर – पिंपळगाव रोठा (ता. पारनेर, जि.नगर) येथे शनिवारी (दि. 23) कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्याने घरात प्रवेश केल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र, माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीमने या बिबट्याने जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
येथील दिलीप जगताप यांच्या घरात हा नर बिबट्या घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. जगताप यांनी हा प्रकार पाहताच घराच्या दुसऱ्या बाजूने जाऊन घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले व दार बंद करून घेतले. तातडीने जगताप यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे (पारनेर) यांना या घटनेची कल्पना दिली. त्यांनी लगेचच माणिकडोह बिबट बचाव केंद्र, जुन्नर यांना कळविले. माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीम, जुन्नर गावकरी रेस्क्यु टीम व वनविभाग टाकळी ढोकेश्वर यांनी संयुक्तरित्या ह्या बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या बाहेर काढले.
घरातील बिबट्याला सुखरूप काढल्यामुळे ग्रामस्थांनी संपूर्ण टीमचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये माणिकडोह बिबट बचाव केंद्राचे प्रमुख डॉ. अजय देशमुख, धोंडू कोकणे, वैभव नेहरकर, आकाश डोळस यांच्यासोबत जुन्नर गावकरी रेस्क्यु टीमच्या विकास मोरे, अजिंक्य भालेराव, नवनाथ गायकवाड, सतीश घाडगे, करण घाडगे, आकाश माळी यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोलाचा वाटा उचलला. तसेच संपूर्ण टाकळी ठोकेश्वर वनविभाग टीम तसेच पोलीस यंत्रणा याप्रसंगी उपस्थित होती.