अजित पवार व परिवाराशी संबंधित दोन फार्महाऊस
पिरंगुट – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व त्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या मुळशी तालुक्यातील दोन फार्म हाऊसवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवार (दि. 23)च्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधी पार पडल्यामुळे हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या राज्याच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थक आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला. या राजकीय उलथापालथीमुळे अजित पवार व कुटुंबीयांशी संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुळशी तालुक्यात अजित पवार व परिवाराशी संबंधित असलेल्या दोन ठिकाणी शनिवारपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. घोटावडे-मुलखेड रस्त्यावर मुळा नदी किनारी असलेल्या फार्म हाऊसवर पौड पोलीस व मुख्यालयातील पोलिसांचा कडा पहारा आहे. तसेच रिहे येथे बंधाऱ्यालगत असलेल्या फार्म हाऊसवरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एवढ्या खबरदारीचे कारण गुलदस्त्यातच
घोटावडे-मुलखेड रस्त्यावरील फार्म हाऊसवर शनिवारीरात्री मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा होता. येथे असलेल्या खासगी सुरक्षारक्षकांकडून कोणालाही आतमध्ये सोडले जात नव्हते. आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाइल फोनही सुरक्षा केबिनवर जमा करण्यात आले आहेत. तसेच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. पोलीस अधिकारी व कर्मचारी आत गेले तर येथे असलेले खासगी सुरक्षारक्षक त्यांच्यासोबत वावरत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. एवढी खबरदारी घेण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.