देहूत दर्शनासाठी भाविकांची रिघ

कार्तिकी वारी : प्रशासकीय तयारी, पोलिसांचा बंदोबस्त

देहूगाव – कार्तिकी एकादशीनिमित्त संत ज्ञानदेवाच्या दर्शनानंतर जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ तीर्थक्षेत्र देहूच्या मुख्य मंदिर आणि वैकुंठगमनस्थान मंदिरात वारकरी, भाविकांनी रविवारी (दि. 24) पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सज्ज प्रशासनासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

कार्तिकी एकादशीनिमित्त गेली दोन-तीन दिवसांपासून वैष्णवांचा मेळा, वारकरी-भाविकांनी देहूत संत श्री तुकाराम महाराज श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शनार्थ गर्दी केली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त म्हणजे संत ज्ञानेश्‍वरांचा संजीवनी सोहळ्यासाठी भाविक तीर्थक्षेत्र आळंदी येथे येत असतात. संत ज्ञानेश्‍वरांच्या दर्शनानंतर हेच भाविक तीर्थक्षेत्र देहू येथे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ येत असतात. संत ज्ञानदेवांनी पाया उभारला, तर संत तुकोबांनी कळस उभारला. महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे अस्मिता असणारे संत आहे.

वैष्णवांचा मेळा, भाविक, वारकरी कार्तिकी एकादशीच्या उपवासा (व्रत) नंतर दुसऱ्या दिवसाच्या म्हणजेच बार्शी दिनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शनात हजारो भाविक देहूत दाखल झाले होते. पहाटेच्या गारव्यात ही भाविकांनी पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावरील घाटावर स्नान विधीसाठी गर्दी केली होती.

यात्रेनिमित्त पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडल्याने मुबलक पाणीसाठा होता. भाविकांच्या घाटावरील व मंदिर परिसरातील गर्दीने दृश्‍य प्रसन्न व मनमोहक तसेच भक्‍तिमय वातावरण निर्माण झाले होते. “ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ।। तुकाराम-तुकाराम हरी’च्या जयघोषाने देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघत होती. मुख्य मंदिरामध्ये भाविकांना दर्शन बारीने दर्शनासाठी सोडण्यात येत होते. वैकुंठगमनस्थान मंदिरात दर्शनार्थ भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता सुरू होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.