पुणे – स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी सांभाळत गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, शहर स्वच्छता तसेच कचरा निर्मूलनाची जनजागृती करणारे महापालिकेचे स्वच्छता सेवक महादेव जाधव आता महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 या मोहिमेचे “सदिच्छा दूत’ होणार आहेत.
जाधव यांच्या या कौशल्याची मदत घेऊन महापालिकेकडून जनजागृती तसेच स्वच्छता उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. दरम्यान, जाधव यांच्या या आगळ्या-वेगळ्या कौशल्याचे सर्वांत प्रथम वृत्त “प्रभात’ने आपल्या वेबसाइटद्वारे दिले आहे.
जाधव हे स्वतःचे काम पूर्ण झाल्यावर किंवा काम करतानाच स्वच्छतेचा प्रचार व प्रसार आपल्या अभिनव कार्यशैली व गाण्यातून करत असतात. पूर्वी ते मनपा इमारतीमध्ये कार्यरत होते. यावेळी स्वच्छतेत त्रुटी दिसल्या, की ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ पाठविणे, एसएमएस करत. त्यामुळे अनेक बाबी समोर आल्या. तसेच या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या माहितीचा वापर करून त्यानुसार कार्यालयीन आदेशही काढण्यात आलेले आहेत.
“सदिच्छा दूत म्हणून सांभाळणार जबाबदारी’
गाण्याची आवड असलेल्या महादेव जाधव यांच्याकडे स्वत:चा माइक, स्पीकर, रेकॉर्डिंग यंत्रणा सर्वकाही आहे. ते वेळ मिळेल तसा याचा वापर करतात. या पूर्वी ते महापालिकेच्या कलापथकातही कार्यरत होते. मात्र, आपले काम हाच आपला देव असल्याचे सांगणारे जाधव आता स्वच्छता मोहिमेचे सदिच्छा दूत असणार आहेत. त्यांनी तयार केलेली स्वच्छतेची गाणी जनजागृतीसाठी वापरण्यात येणार असून त्यांचे कार्यक्रमही शहरात नियोजित करण्यात येणार आहेत.