भाजपा कार्यकर्त्याची ‘मासेमारी’

मासे पळविल्याची चर्चा; “बर्ड व्हॅली’मध्ये घडला प्रकार

पिंपरी – भारतीय जनता पक्षाचे राज्यपातळीवरील नेते अन्य पक्षातील आमदारांसाठी “गळ’ टाकून बसलेले असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील याच पक्षाच्या केलेल्या “मासेमारी’चा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे. महापालिकेच्या “बर्ड व्हॅली’मधून या कार्यकर्त्याने पार्टीसाठी चक्क माशांची पळवा-पळवी केल्यामुळे या प्रकारामुळे सर्वजण अवाक्‌ झाल्याचे चित्र दिसून आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीचे तीन तलाव शहरात आहेत. भोसरी, बर्ड व्हॅली आणि दुर्गादेवी टेकडी या ठिकाणी हे तलाव आहेत. पावसाळ्यामुळे हे तलाव सध्या भरलेले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून या तलावामध्ये मासे पाळले जात नाहीत. मात्र नैसर्गिकरित्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माशांची निर्मिती होते. दरवर्षी या तीनही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे पहावयास मिळतात.

या माशांमुळे तलाव स्वच्छ राहत असल्याचा दावा पालिकेच्या उद्यान विभागाकडून आजपर्यंत करण्यात आला आहे. या तीनपैकी एक असलेल्या बर्ड व्हॅली या तलावातून माशांची मोठ्या प्रमाणात पळवा-पळवी झाल्याचे उजेडात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरे शहराच्या विविध भागात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या पदाधिकाऱ्याने बर्ड व्हॅली परिसरालाही भेट दिली होती. या भेटीच्या वेळी काही भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत होते.

भेटीप्रसंगी तलावात मोठ्या प्रमाणात मासे असल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले होते. दोन दिवसांचा अवधी देत यातील एका कार्यकर्त्यांनी थेट तलावातील माशांवरच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तलावातील मासे मोठ्या प्रमाणात गायब झाल्याची चर्चा रंगल्यानंतर ठेकेदाराच्या एका कर्मचाऱ्यानेच मासे कोणी गायब केले याची माहिती दिल्यानंतर हा चर्चेचा विषय बनला.

हा कार्यकर्ता कोण? यावर सध्या चर्चा रंगली आहे. पालिकेत सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याने अशा प्रकारे केलेला किळसवाणा प्रकार त्यांच्याच पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी चुकीचा असल्याचे सांगितले. मात्र नेमका कार्यकर्ता कोण हे शोधून त्यावर योग्य ती कारवाई पक्ष करेल, असेही सांगण्यात आले.

माशांची यापूर्वीही चोरी – साळुंखे
बर्ड व्हॅली तलावातील मास्यांची चोरी झाल्याच्या घटनेबाबत उद्यान विभागाचे अधीक्षक सुरेश साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापालिका मासे पाळत नाही. नैसर्गिक पद्धतीने माशांची निर्मिती होते. ही वस्तुस्थिती आहे. शहरातील तलावांशेजारी झोपडपट्ट्या आहेत. यापूर्वीही काही वेळा माशांची चोरी झाली आहे. मात्र एखाद-दुसरा मासा घेऊन जाण्याचे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांत चोरी झाल्याचे मला माहिती नाही, असा प्रकार घडलेला नसावा मात्र माहिती घेऊन त्याबाबत बोलू, असे म्हणून सुरेश साळुंखे यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.