प्रश्न विचारण्याची सवय लावा; संविधानाचा सन्मान हीच राष्ट्रभक्ती
इस्लामपूर (प्रतिनिधी) – वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आधुनिक मानवाचे महत्त्वाचे लक्षण आहे. प्रश्न विचारण्याची सवय लावणे, भारतीय संविधानाचा सन्मान करणे ही राष्ट्रभक्ती आहे. ग्रहणे हा सावल्यांचा खेळ आहे. सूर्यग्रहणासारखा खगोलीय अविष्कार पाहण्याची संधी दवडू नये, असे मत ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे कार्यकारी सदस्य व खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. विवेक मोंटेरो यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित “सूर्योत्सव 2019′ राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रभारी प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे अध्यक्षस्थानी होते.
भारताच्या चांद्रयान मोहीम-2 मध्ये सोडण्यात आलेले अवकाशयान चंद्राभोवती फिरत असल्याच्या प्रतिकृतीची कळ दाबून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. म. फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. एन. आर. पाटील, अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. मोंटेरो म्हणाले, सूर्यग्रहणाविषयीच्या अंधश्रद्धा, गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. याबद्दल व्यापक प्रबोधन करून ग्रहण अनुभवा. 26 डिसेंबरचे सूर्यग्रहण किमान दहा लाख लोकांनी पाहावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गीता महाशब्दे यांनी सूर्योत्सवाची संकल्पना सांगून खगोलशास्त्राचे प्रयोग दाखवले.
प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तृप्ती थोरात, मयुरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिवानी चौगुले यांनी आभार मानले. डॉ. संजय निरवे, प्रा. विजयकुमार जोखे, सुजाता म्हेत्रे, डॉ. प्रमोद गंगनमाले, अवधूत कांबळे, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. योगेश कुदळे, प्रा. अनिल कुलकर्णी उपस्थित होते. विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. प्रज्वल पाटील, धनश्री गावडे, अजय तांबट, दीपक सुतार, गीता चव्हाण, संपदा खोत, नीलेश कुडाळकर, प्रा. बी. आर. जाधव, संकेत तांबारे यांनी संयोजन केले. न्यूटन, आईन्स्टाईन, मेरी क्युरी, सूर्यमाला यांच्या प्रतिकृती, सूर्यग्रहणाची रांगोळी, पोस्टर प्रदर्शन हे कार्यशाळेचे आकर्षण ठरले होते.