दोन्ही अधिकारी प्रथमच एकत्र
मुख्याधिकारी शंकर गोरे व मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांचा प्रशासकीय अबोला संपूर्ण साताऱ्याला ठाऊक आहे. मात्र, रस्ते पाहणीच्या निमित्ताने प्रशासनाचे हे दोन्ही मुख्य अधिकारी पहिल्यांदाच एकत्र आले. शंकर गोरे यांनी ठेकेदारांची बैठक घेतल्यानंतर ताबडतोब भाऊसाहेब पाटील यांनी ठेकेदारांना सूचना देऊन तातडीच्या कामाची अंमलबजावणी करण्यास सांगितले. हा दोघांमधील समन्वय खरोखर सुखद धक्का होता.
सातारा – सातारा शहरात रस्ते पॅचिंगच्या कामाला सुरवात झाली आहे. बोगदा- अदालतवाडा- शाहू चौक या दरम्यानच्या रस्ते पॅचिंगच्या कामाची पाहणी उपाध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली. रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार करा, अशा सूचना मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिल्या.
राजपथ, कर्मवीर पथ, राधिका रोड या तिन्ही रस्त्यांचे पॅचिंग पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या कामांची सुरवात बुधवारी बोगदा परिसरातून करण्यात आली. कामे दर्जेदार होण्याच्या अनुषंगाने उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बोगदा परिसर, समर्थ मंदिर चौक, अदालत वाडा, शाहू चौक आदी भागांची पाहणी केली. यावेळी बांधकाम सभापती सविता फाळके, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, मुख्याधिकारी शंकर गोरे, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील, अभियंता अनंत प्रभुणे उपस्थित होते.
पॅचिंगच्या कामाची पाहणी करताना रस्ते दुरूस्तीच्या मानकांप्रमाणे काम होतेय का, याची पाहणी मुख्याधिकारी शंकर गोरे व भाऊसाहेब पाटील यांनी केली. “आघाडी प्रमुख माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करा याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शाहू चौक ते बोगदा, राधिका रोड व शहर पोलीस स्टेशन ते सातारा मध्यवर्ती बस स्थानक या रस्त्यांचे पॅचिंग करण्यात येऊन रस्ते खड्डेविरहित करण्याचा प्रयत्न आहे. या कामांसाठी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्दळीचे प्रमुख रस्ते झाल्यानंतर दोन टप्प्यांत अकरा सेवा रस्त्यांचे पॅचिंग करण्यात येणार आहे,’ असे किशोर शिंदे यांनी “प्रभात’ला सांगितले.