डॉक्टरांच्या चौकशीनंतर सर्व कागदपत्रे घेतली ताब्यात
भिगवण (वार्ताहर) – मदनवाडी (ता. इंदापूर) येथील चौदा महिन्याचा मुलाचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केलेल्या भिगवण येथील रामलावण्य हॉस्पिटलला पुणे जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सक राजेश मोरे, इंदापूर तालुकाधिकारी सुरेखा पोळ यांच्या पथकाने सील ठोकले आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, मदनवाडी येथील दीड वर्षाच्या वेदांत सोमनाथ राऊत या बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप बालकाचे वडील सोमनाथ राऊत यांनी केला आहे. त्यामुळे भिगवण येथील संबंधित डॉक्टर त्रिंबक काळे यांच्या रामलावण्य हॉस्पिटलची तपासणी करून आज संध्याकाळी जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सक राजेश मोरे आणि इंदापूर तालुका आरोग्यधिकारी सुरेखा पोळ यांच्या पथकाने सुमारे दोन तास हॉस्पिटलमध्ये सर्व बाबींची चौकशी करून हॉस्पिटलला सील ठोकले आहे.
यावेळी संबंधित पालकांच्या नातेवाईकांनी तपासणीसाठी आलेल्या पथकाकडे मुलाच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या डॉक्टरची अनेक कारणे आणि त्यामुळे झालेला मुलाचा मृत्यू ही डॉक्टरांची चूक आहे, असे लक्षात आणून दिले. या डॉक्टरकडे वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. मागील दोन दिवसात लहान मुलांचा जीव गेल्याने त्यांच्या नातेवाईकांनी भिगवण पोलिसांना याबाबत माहिती दिली असून इंदापूर नाभिक संघटनेने पाठिंबा देऊन आज भिगवण अमर बौद्ध संघटनेच्या वतीने भिगवण येथे अमोल कांबळे यांनी राऊत कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी उपोषण केले. त्यामुळे याविषयी दबाव वाढल्याने आरोग्य विभागाने संध्याकाळी उशिरा रामलावण्य हॉस्पिटलची चौकशी करून सर्व कागदपत्रे ताब्यात घेत तपासणी करून हॉस्पिटल सील केले.
मयत मुलाचा शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत आम्ही या डॉक्टरची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली असून दवाखान्यातील सर्व औषधांची तपासणी करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित हॉस्पिटल सील करण्यात आले आहे.
– सुरेखा पोळ, आरोग्य अधिकारी, इंदापूर