सातारा – सातारा, मेढा व पाचगणी परिसरात घरफोड्या करणारी अविनाश चंद्रकांत गोळे, किरण चंद्रकांत बेलोशे, किशोर शामराव गोळे, गणेश चंद्रकांत बेलोशे (रा. रुईघर, ता.महाबळेश्वर) यांची टोळी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे अहवाल पाठवला होता.
याबाबत माहिती अशी, या टोळीवर सातारा शहर, मेढा, पाचगणी या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आल्याच्या तक्रारी पोलीस दलाकडे आल्या होत्या. त्यामुळे सातारा शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर सातपुते यांनी संशयितांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.