चिमणपुरा, रामाचा गोट येथे रस्ता खड्ड्यात हरवला
सातारा – समर्थ मंदिर चौकात खड्ड्यांमध्ये टाकलेल्या मुरूमाचा धुरळा उडत असल्याने समोरून येणारे वाहन नीट दिसत नसल्याने अपघात वाढले आहेत. शहराच्या पश्चिम भागात खड्डेमुक्तीच्या गप्पा झाल्या आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे बोगदा ते समर्थ मंदिर या दरम्यान वाहने घसरण्याचे प्रकार सुरू आहेत.
भुयारी गटार योजनेच्या कामामुळे धस कॉलनी, ढोणे कॉलनी, रामाचा गोट परिसरात नागरिकांना खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात कॉंक्रिट रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेच्या साठमारीतून भाजपने अंग काढून घेतल्याने सध्या तरी ही गोष्ट सातारा शहरासाठी दिवास्वप्न ठरणार आहे. साताऱ्यात खड्ड्यांच्या पॅचिंगसाठी ठेकेदारांना तीस लाख रुपये देण्यात आल्याचे वित्त विभागाच्या हवाल्याने सांगण्यात आले. मात्र, पॅचिंगमध्ये डांबराऐवजी मुरूमच खड्ड्यांमध्ये पडत असल्याने सातारकर चकित झाले आहेत.
पालिकेकडून केवळ कागदी घोडे
उदयनराजे भोसले यांनी कानपिचक्या देऊनही पालिकेच्या कारभारात फरक पडलेला नाही. ठेकेदारांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या होत्या तरी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून अद्याप सर्वेक्षण सुरू आहे. अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी हा विषय राजकीय दबावामुळे बाजूला ठेवला आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे व भाऊसाहेब पाटील यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य असल्याने पॅचिंगच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. उदयनराजे सोमवारी साताऱ्यात परतले असून गोरेंच्या कार्यपद्धतीची झाडाझडती होणार असल्याची चर्चा आहे.
भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांची वाट
धस कॉलनी ते साईविहार अपार्टमेंट दरम्यान रस्ता थोडा सुस्थितीत असला तरी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या घरासमोरच मोठा खड्डा आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. हाच रस्ता पुढे कोल्हटकर आळीतून जातो. या रस्त्याला अनेक फाटे आहेत. त्यातील एक फारा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाकडून ढोणे कॉलनीकडे जातो.
या भागात भुयारी गटार योजनेचे चेंबर बांधताना रस्ते अनियमित खणण्यात आले. मुरूमाचा राडारोडा रस्त्यावरच टाकून दिल्याने रामाचा गोट, चिमणपुरा पेठ, शौनक रेसिडेन्सी, कारंडबी नाका या भागात पावसाळ्यात दलदल झाली होती. या भागांना निधी किती मिळणार याचे अद्याप नियोजन झालेले नाही. कारण बांधकाम विभागाकडेच अद्याप त्याचे नियोजन नसल्याने अडचण झाली आहे.