वडूज – शितोळेनगर (निमसोड) ता. खटाव येथे मंगळवार, दि. 12 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केल्याची माहिती संयोजक विजयशेठ शितोळे यांनी दिली.
माजी सरपंच कै. पै. आप्पासाहेब शितोळे यांच्या स्मरणार्थ या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात महाराष्ट्र केसरी बाला रफिक व जागतिक विजेता मल्ला पै. अब्दुल इराणी यांच्यात प्रथम क्रमांकाची 2 लाख 51 हजार रूपये इनामाची कुस्ती होणार आहे.
द्वितीय क्रमांकाची 1 लाख 51 हजार रूपयांची कुस्ती नागाचे कुमठेचा मल्ल मोठा पांडुरंग मांडवे विरूद्ध संदीप काळेवाडी पुणे यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची 1 लाख रूपये इनामाची कुस्ती पै. प्रशांत शिंदे जाखणगाव विरूद्ध पै सचिन पवार खवसपूर यांच्यात लढत होणार आहे. चतुर्थ क्रमांकाच्या 51 हजार इनामासाठी पुणेच्या बुचडे तालमीचा मल्ल सुबोध पाटील विरूद्ध संतोष पडळकर सातारा तर पाचव्या क्रमांकाच्या 25 हजार इनामासाठी शरद पवार पारगाव विरूद्ध संदिप बोराटे कुंडल अशा लढती होणार आहेत.
आ. जयकुमार गोरे, सातारा यशवंत टिमचे पुरूषोत्तम जाधव, माजी सभापती संदीप मांडवे, पं. स. सदस्य धनंजय चव्हाण, रामभाऊ देवकर, काकासाहेब मोरे आदींसह मान्यवरांना या मैदानासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सांगलीचे जोतीराम वाझे कुस्ती निवेदन करणार आहेत. तर ताकवडे (इचलकरंजी) येथील विशाल कांबळे यांचे हलगी वादन होणार आहे. परिसरात मल्ल व कुस्ती शौकिनांनी मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सरपंच सुभाष शितोळे व संयोजकांनी केले आहे.