तेहरान (इराण) : भविष्यात आण्विक करारापासून अधिक दूर जाण्याची घोषणा आज इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी केली. अणू कराराबाबतच्या बांधिलकीपासून भविष्यात अधिक दूर जाण्याची पावले उचलली जातील. तसेच कोम प्रांतातील फर्डो युरेनियम समृद्धीकरणाच्या सुविधा केंद्रामध्ये युरेनियम गॅसचे 1 हजार सेंट्रिफ्युज बसवली जातील, असेही रौहानी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आपला निर्णय अपरिवर्तनीय असून अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची भरपाई करावी, असे इराणने अणू करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या देशांना उद्देशून म्हटले आहे. संयुक्त सर्वसमावेशक कृती आराखड्याबाबत रौहानी लवकरच मोठी घोषणा करतील असे इराणचे प्रवक्ते अली राबाई यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितले होते.
इराणच्या अणू कार्यक्रमाला नियंत्रित करणे आणि अण्वस्त्रे निर्माण करण्यास प्रतिबंध हेतूने हा संयुक्त सर्वसमावेशक कृती आराखड्यावर अमेरिकेसह काही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणवर नव्याने निर्बंध लादले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्याशी संबंधित 9 व्यक्तींवर अमेरिकेने बंदी घातली आहे.