नवी दिल्ली: लोकजनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खासदार चिराग पासवान यांची निवड झाली आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे या पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी ही धुरा आता आपल्या चिरंजीवांच्या हातात सोपवली आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहींर केले. हा पक्ष रामविलास पासवान यांनी सन 2000 साली स्थापन केला असून पक्षाला बिहार आणि काही प्रमाणात उत्तरप्रदेश मध्ये दलितांचे मोठे समर्थन प्राप्त आहे.
73 वर्षीय पासवान यांनी प्रथमच या पक्षाची धुरा सोडून ती आपल्या पुत्राच्या हाती सोपवली आहे. चिराग पासवान हे दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले असून सध्या पक्षाच्या निर्णयाचे अधिकार त्यांच्याच हातात एकवटले आहेत. त्यामुळे तेच या पक्षाचे अध्यक्ष होतील अशा अटकळी सुरूवातीपासूनच बांधल्या जात होत्या.