पुणे – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खंडेराया जेजुरी गडाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती जेजुरी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर साकारली आहे. या वैविध्यपूर्ण प्रतिकृतीमुळे रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटले आहे.
जेजुरी गडाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असल्याने राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या भाविकांना आकर्षित करण्यासाठी गडाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रवेशद्वाराच्या चारही बाजूला पुरातन काळातील खिडक्यांचा आकार देण्यात आला आहे. तसेच, प्रवेशद्वाराच्या मध्यभागी मोठी घंटा बांधण्यात आली आहे.
जेजुरी स्थानकावर प्रवाशांसाठी सोईसुविधा करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्लॅटफॉर्मवर एक हजार स्क्वेअर फुटाचे छत नव्याने तयार केले आहे. तसेच, शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसविला आहे. प्लॅटफॉर्म एकवर रेल्वेचे 24 डबे बसतील एवढी लांबी व उंची वाढविण्यात आली आहे. याचबरोबर, रेल्वेस्थानक आकर्षित होण्यासाठी गडाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकाची स्वच्छता राखावी, असे आवाहन पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर यांनी केले आहे.