बॅंकांमुळे खरेदी, विक्री, भाव, गुंतवणुकीतील पारदर्शकता वाढेल
पुणे – चीनसह बहुतांश विकसित देशांमध्ये सुवर्ण बॅंका कार्यरत आहेत. भारतामध्ये सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असूनही सुवर्ण बॅंकेची कल्पना रुढ झालेली नाही. त्यामुळे सोन्याची खरेदी, विक्री, गुंतवणूक याबाबत बरीच संदिग्धता निर्माण होते. भारतात ही संकल्पना रूढ झाल्यानंतर या क्षेत्रात पारदर्शकता वाढू शकेल, असा सल्ला जागतिक सुवर्ण परिषदेने भारत सरकारला दिला आहे.
सोन्यासंदर्भात भारतामध्ये बराच व्यवहार अनौपचारिक पद्धतीने चालतो. सुवर्ण बॅंक ही संकल्पना भारतात अंमलात आली तर, हे व्यवहार औपचारिक कक्षेत येऊ शकतील. त्यामुळे या क्षेत्रातील संदिग्धता कमी होऊ शकेल. भारतातील सोन्याची बाजारपेठ मोठी असली तरी ती विखंडित आणि अनौपचारिक स्वरुपामध्ये चालते. सुवर्ण बॅंक संकल्पना भारतात आल्यानंतर व्यावसायिक बॅंकांना सोन्यासंबंधात अधिक व्यवहार करता येऊ शकतील. त्यामुळे या बॅंका सोन्यासंदर्भातील वित्तीय उत्पादने नागरिकांना उपलब्ध करू शकतील. त्यामुळे सोन्याच्या अनुषंगाने होणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होऊ शकेल.
अमेरिका स्वित्झर्लंड, ब्रिटनसह चीनमध्ये सुवर्ण बॅंकिंग ही संकल्पना आता रुढ झालेली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी दोन अब्ज डॉलरचे व्यवहार होत आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून भारत सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने ही संकल्पना भारतात रूढ करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आम्ही सरकारला सांगितले असल्याचे सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम आर यांनी सांगितले.
…तर आयातीची गरज कमी पडेल
व्यावसायिक बॅंकांप्रमाणेच सुवर्ण बॅंका सोन्याची खरेदी, विक्री त्याचबरोबर योग्य मानदंडाचे सोने वापरात असणे यासंबंधिचे व्यवहार करतील. त्याचबरोबर सोन्यावर आधारित बरीच डिजिटल उत्पादने उपलब्ध करू शकतात. भारत आपल्या गरजेच्या 90 टक्के सोने आयात करतो तर, केवळ 10 टक्के सोन्याचा पुनर्वापर होतो. जर सुवर्ण बॅंक संकल्पना अस्तित्वात आली तर पुनर्वापराचे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.