लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कारभार आणखी जलदगतीने व्हावा, यासाठी आणखी चार सहायक पोलीस आयुक्तांची आवश्यकता आहे. यासाठी मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात झोन एकमधील वाकड आणि देहूरोड असे दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. तर झोन दोनमध्ये पिंपरी आणि चाकण विभागासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. गुन्हे शाखेचे पाच युनिट, दरोड-खंडणी विरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, पीसीबी आणि एमओबी विभाग, सायबर विभाग यासाठी दोन सहायक आयुक्त आहेत. एक प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी तर एक वाहतूक विभागासाठी सहायक आयुक्त असे एकूण आठ सहायक आयुक्त कामकाज पाहत आहेत. हे सर्व कामकाज पाहताना पोलीस अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो. हा ताण हलका व्हावा आणि पोलिसांच्या कामकाजाला गती प्राप्त व्हावी, यासाठी आणखी चार सहायक पोलीस आयुक्तांची पदे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मंजूर करावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
नवीन सहायक आयुक्तांकडे गुन्हे विभागातील प्रतिबंधक कारवाई आणि अभियोग (न्यायालयीन समन्स इत्यादी), वाहतूक विभागचेही विभाजन करण्यात येणार असून या विभागासाठीही आणखी एक सहायक आयुक्तांची मागणी करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांची आणि फसवणुकीच्या तक्रारी पाहता या विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी स्वंतत्र सहायक आयुक्तांची गरज आहे. तर मुख्यालयातील कामकाजाकरिता आणखी एका सहायक आयुक्तांची गरज असल्याने चार नवीन सहायक पोलीस आयुक्तांची गरज असल्याने हा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
पुणे पोलीस दलात एक आयुक्त, एक सहआयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त, दहा उपायुक्त तर 27 सहायक आयुक्त कामकाज पाहत आहेत. तर पिंपरी पोलीस आयुक्तालयात एक आयुक्त, एक सहआयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, आठ सहाय्यक आयुक्त कामकाज पाहत आहेत. पुण्याच्या तुलनेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी पोलीस आयुक्ताकडून प्रयत्न सुरू आहेत. तर पोलीस कर्मचारी भरतीसाठीही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच या भरतीसाठी प्रथम लेखी परिक्षा होणार असून त्यानंतर शाररीक चाचणी होणार आहे.