ग्रामीण अर्थकारणावर दूरगामी परिणाम

पिके भुईसपाट : जनजीवन विस्कळीत

सोरतापवाडी – पूर्व हवेलीतील कदमवाकस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे, आळंदी म्हातोबाची, कोरेगाव मूळ, उरुळी काचंन, शिंदवणे, वळती आदी गावांतील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

उसासह मका, कांदे, बाजरीचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली बाजरी मातीमोल झाली आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी दिवसभर धुक्‍याचे वातावरण होते. अचानक पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुरूवातीला पिके पेरणीच्या वेळी पावसाने उशीर केल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. आता काढणीला आलेली पिके पावसात भिजत आहेत. बाजरीही मातीत गेल्याने हक्‍काचे पीकही हातातून गेले आहे. कांदा पाण्याने खराब होत आहे.

ऊस पिकात पाणी साचल्याने सऱ्या भरलेल्या आहेत. त्यामुळे लागवडीचा ऊस कुजला आहे. तोडणीला आलेली फुले काळी पडून कुजली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या वेळी फुलांचा हंगाम वाया गेला आहे. परतीच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

आधीच खरीप वाया गेला आता रब्बीवरही पावसाचे सावट निर्माणझाले आहे. हातातोंडाशी आलेली पीके पावसामुळे काही ठिकाणी वाहून गेली तर काही ठिकाणी साठलेल्या पाण्याने भाजीपाल्याचा चिखल झाला आहे. अती पावसामुळे टोमॅटो, प्लॉवर, कोबी, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, काकडी, दुधी भोपळा आदी तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. रोपांवर बुरशी पडली आहे. कांदा रोपे पिवळी पडल्याने लागवड घटण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.