“1121’ला ग्राहकांची सर्वाधिक पसंती : ऑक्टोबरच्या अखेरीस आवक वाढणार
पुणे – हरियाणा, पंजाब येथून नवीन बासमती 1509 प्रकारच्या तांदळाची आवक सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या तांदळाची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांनी या तांदळाच्या उत्पादनास अधिक पसंती दिली आहे. याबरोबरच 1121 या प्रकारच्या बासमतीस ग्राहकांची सर्वाधिक पसंती असते. या तांदळाची आवक ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे
हॉटेल, खानावळ, बिर्याणी हाऊस आणि लग्न समारंभासाठी सर्वाधिक प्रमाणात 1509 आणि 1121 प्रकारच्या तांदळाचा वापर केला जातो. पूर्वी पारंपरिक बासमतीचा उपयोग सर्वाधिक केला जात होता. नंतरच्या काळात 1509 आणि 1121 बासमती तांदळाचा वापर केला जावू लागला आहे.
या तांदळाची अधिक लांबी आणि सुंदरता असल्याने जवळपास 60 टक्के विक्री या तांदळाची होत असल्याचा दावा तांदळाचे व्यापारी आणि दी पूना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केला आहे. येत्या हंगामात पारंपरिक बासमतीची लागवड उत्तरप्रदेशात अधिक प्रमाणात झाली आहे. तसेच बिगर सुवासिक तांदळाच्या सर्व प्रकारांची लागवड कमी झाली असून 1509 आणि 1121 बासमती तांदूळ अधिक प्रमाणात दाखल होणार असल्याचेही बाठिया यांनी सांगितले.
सर्वाधिक निर्यात
या तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षामध्ये इराणला 144 लाख टन आणि सौदी अरेबियाला 9 लाख टन तांदळाची निर्यात झाली. युरोपला पारंपरिक आणि अन्य बासमतीची अंदाजे 4 लाख टन इतकी निर्यात होते. यंदा येणारे पीक गेल्या वर्षापेक्षा किंचित जास्त आहे. पुढील महिन्यात 1121 जातीचा बासमती तांदूळ आणि पारंपरिक सुवासिक बासमतीची आवक आल्यानंतर बाजार भावाचे अचुक अंदाज येतील. सद्यःस्थितीत दाखल झालेल्या 1509 तांदळाचे भाव प्रती क्विंटल 7 हजार ते 7 हजार 500 रुपये आहेत.