महेश लांडगे यांची बाजी : अपक्ष विजयाच्या परंपरेत खंड
पिंपरी – भोसरीत माजी आमदार सासऱ्याविरूध्द लढलेला भाचेजावई, या बहुचर्चित लढतीत जावयाने पुन्हा एकदा सासऱ्यावर मात केली. पै-पाहुण्यांच्या भोसरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत विलास लांडे यांना पराभूत करून आमदार महेश लांडगे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली आहे.
भाजपकडून खेचून आणलेली उमेदवारी, नाराजांना आयत्यावेळी आपल्याकडे वळविण्यात आलेले यश, प्रचाराचे वॉर्डनिहाय केलेले मायक्रो प्लॅनिंग अन् केलेल्या कामांचे जोरदार “मार्केटींग’ यामुळे मतदारांनी लांडगेंच्या पारड्यात भरभरुन मतांचे दान टाकले. वस्ताद पैलवानावर भारी पडणार, असा दावा लांडे यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र, भोसरीच्या मैदानात पैलवानच वस्तादावर भारी पडल्याची चर्चा रंगली आहे.
भोसरी मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात 58.65 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2 लाख 58 हजार 719 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याठिकाणी 20 टेबलांवर मतमोजणी झाली.
महेश लांडगे व विलास लांडे यांच्यातील नातीगोती व सत्तासंघर्षांमुळे भोसरीच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. भाजपविषयी असलेल्या नकारात्मक वातावरणात लांडे त्यांनी मोठे आव्हान उभे केले. मात्र भाजपचे चिन्ह, नगरसेवक, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते यांची मोठी फौज लांडगे यांच्या पाठीशी होती. शिवसेना, मित्र पक्ष यांच्यामुळे पक्षातील मतांची फाटाफूट झाली नाही हे लांडगे यांच्या पथ्यावर पडले.
लांडगे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. पहिल्या फेरीअखेर लांडगे यांना चार हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत लांडगे यांना 17 हजार 953 मते तर विलास लांडे यांना 7971 मते पडली. नवव्या फेरीपर्यंत लांडगे यांनी 10 ते 15 हजार मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीअखेर लांडगे यांना 69 हजार 873 तर लांडे यांना 37 हजार 365 मते पडली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात अकराव्या फेरीत लांडगे यांना तब्बल 84 हजार 095 मते मिळाली तर लांडे यांनी 44365 मते घेतली. तेराव्या फेरीत महेश लांडगे यांना 97 हजार 939 तर विलास लांडे 52 हजार 744 मते मिळाली.
चौदाव्या फेरीत महेश लांडगे 1 लाख 6 हजार 126 मतांचा टप्पा गाठला. भोसरी विधानसभा मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या झाल्या. बावीसाव्या फेरीअंती महायुतीचे उमेदवार लांडगे यांना 1 लाख 59 हजार 295 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. पोस्टल मतदानात महेश लांडगे यांना 275 तर विलास लांडे यांना 185 मते मिळाली. विलास लांडे यांना मिळालेल्या मतांच्या जवळपासचे मताधिक्य महेश लांडगे यांना मिळाले. 77 हजार 567 एवढे लांडगे यांना मताधिक्य मिळाले. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे त्यांना खुले समर्थन मिळाले. मात्र साने यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या मोशी, सानेवस्ती या भागातही लांडगे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.
भोसरीत भंडाऱ्याची उधळण
सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात केली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत विजयाचा जल्लोष करण्यात आला. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या बाहेर आमदार महेश लांडगे येताच तिथे थांबलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जयघोष केला. त्यावेळी पैलवान असलेल्या लांडगे यांनी शड्डू ठोकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला होता. मतदार संघातील मुख्य चौकांसह आमदार लांडगे यांच्या कार्यालयाबाहेर भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे भोसरी भंडाऱ्यात न्हाल्याचे पहायला मिळाले.