८,८४९ मतदारांनी हक्क बजावला : ७०.४० टक्के मतदान
शिक्रापूर – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्रापूर येथील मतदान केंद्रावर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. या मतदान केंद्रावर 12 हजार 261 मतदारांपैकी 8 हजार 849 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिक्रापूर केंद्रावर 70.40 टक्के मतदान झाले.
शिक्रापूर येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदान शांततेत पार पडले. दिवसभर मतदारांनी लांबच्या लांब रांगा लावलेल्या होत्या. त्यामुळे शिक्रापूर येथील मतदान केंद्र चर्चेचा विषय बनला होता. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहील, असा अंदाज सर्वांनी बांधला होता. सायंकाळी सहाच्यादरम्यान मतदान केंद्राचे मुख्य गेट बंद करण्यात आले.
यावेळी सर्व मतदारांना केंद्राच्या आतमध्ये असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत मतदान करणार असल्यामुळे येथे रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था केली होती. गेट बंद केल्यानंतर दोनशेहून अधिक मतदार केंद्रात हजर होते.
यावेळी मतदान केंद्रावर रात्री उशिरा मतदान सुरू असल्याचे पाहून मतदान अधिकारी देखील अवाक् झाले. यावेळी दिवसभर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिक्रापूर पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिक्रापुरात प्रथमच उशिरापर्यंत मतदान –
शिक्रापूर येथील मतदान केंद्रावर आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही निवडणुकीचे मतदान होत असताना सायंकाळी वेळ संपण्यापूर्वीच सर्व मतदारांचे मतदान होत होते. परंतु आज इतक्या उशिरा मतदान सुरू असल्याचे शिक्रापुरच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे शिक्रापूर येथील ज्येष्ठ मतदारांनी सांगितले आहे.