परळी: भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे स्टेजवरच कोसळल्या. भाषणादरम्यानच ही घटना घडल्याने घटनास्थळी एकच धावाधाव झाली. परळीतील टॉवर परिसरात भाजपची सभा होती. त्यावेळी ही घटना घडली. पंकजा मुंडे खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
प्रचाराचा शेवट दिवस असल्यानं आज अनेक ठिकाणी पंकजा मुंडेंच्या सभा होत्या. त्यांची शेवटची सभा परळीत होती. या सभेत त्यांनी भावनिक भाषण करत मतदारांना साद घातली. मात्र भाषण संपताच त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या.
पंकजा मुंडे केवळ नाश्ता करुन बाहेर पडल्या होत्या. त्यांनी दिवसभर जेवण केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबत होते. चक्कर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पंकजा यांना कोणताही गंभीर आजार नाही. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.