सिनेकलाकारांना एका चित्रपटासाठी नेमके किती मानधन मिळते ही बाब कधीच अचूकपणाने समोर येत नाही. पण तरीही आघाडीचे कलाकार भरभक्कम पैसे घेऊन चित्रपट करत असतात ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. नवोदित असताना त्यांना “मला चित्रपटात ब्रेक द्या’ म्हणून विनवण्या कराव्या लागलेल्या असतात; पण एकदा त्यांचे तारे चमकले आणि ते हिट झाले की मग निर्माते-दिग्दर्शकांना त्यांच्या मागे धावावे लागते. अशा वेळी ही स्टार मंडळी केवळ तारखांचीच नव्हे तर त्याहून पहिल्यांदा अट घालतात ती मानधनाची.
अलीकडे तर चित्रपटाच्या एकूण कमाईतील हिश्श्यामध्येही कलाकारांनी वाटा मागण्यास सुरुवात केली आहे आणि तो मिळूही लागला आहे. तरीही दिवसेंदिवस कलाकारांचे मानधनाचे आकडे वाढत चालले आहेत. सलग सहा हिट चित्रपट देणाऱ्या आयुष्मान खुरानामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आयुष्मानचा “ड्रीम गर्ल’ हा आतापर्यंतचा त्याचा सर्वांत सुपरहिट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी “बधाई हो’ हा चित्रपट तिकिट खिडकीवर तुफान चालला होता. या चित्रपटाने 136.80 कोटींची कमाई केली होती. आता ड्रीम गर्लने 140 कोटींचा आकडा पार केला असून ही कमाई वाढतच जाणार आहे. इतके सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आयुष्मानला एका चित्रपटासाठी “फक्त’ 2 कोटी रुपये मिळतात. पण आता यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आयुष्मान आपले मानधन वाढवणार आहे म्हणे!
आगामी काळात नव्या चित्रपटांसाठी तो 10 कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचे कळते आहे. त्याच्या मीडियम बजेट चित्रपटांनीही जबरदस्त फायदा मिळवला आहे. ड्रीम गर्लचाच विचार केला तर हा चित्रपट अवघ्या 40 कोटींमध्ये तयार झाला होता. पण या चित्रपटाने आता निर्मितीखर्चापेक्षा 100 कोटींहून अधिक पैसा मिळवला आहे. याखेरीज डिजिटल माध्यमातून मिळणारा पैसा आणि संगीताच्या हक्कांचा मिळणारा पैसा वेगळाच आहे ! आपल्या जीवावर जर निर्माते इतकी भरभक्कम कमाई करत असतील, तर आपणही मागे का राहायचे, असा विचार आयुष्मानने केला तर चुकले काय?