पिंपरी – शहरातून राष्ट्रवादी संपली असून या निवडणुकीत महायुतीच विजयी होईल, असा विश्वास चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला आहे. जगताप यांनी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही आमदार जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
भाजप-शिवसेनेचे महायुतीच्या नेत्यांची बुधवारी आकुर्डीत बैठक झाली. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जगताप बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, भोसरीचे उमेदवार महेश लांडगे, पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे, खादी व ग्रामविकास मंडळाचे उपसभापती हेमंत तापकीर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शरहप्रमुख योगेश बाबर, उमा खापरे, शैला मोळक, राजेश पिल्ले, बाबू नायर, महेश कुलकर्णी उपस्थित होते.
शहरात केलेली विकासकामे आणि भविष्यातील शहराचे नियोजन करुन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. जनता विकासकामे करणा-यांना पसंती देईल. यामुळे शहराच्या तीनही विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असे विश्वास लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला.
भोसरीचे उमेदवार महेश लांडगे म्हणाले, लोकसभेला देखील विरोधकांनी भाजप विरोधात मोट बांधली होती. परंतु, ती यशस्वी झाली नाही. आताही तेच होणार आहे. जनता विकास कामे करणा-यांच्या पाठिशी उभी राहते. आम्ही शहरातील विकास कामाच्या जोरावर जनतेसमोर जात आहोत.