पुणे (प्रतिनिधी)– राज्यात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर खडकी कॅन्टोमेन्टच्या हद्दीमध्ये सुरु असुन, त्यावर बोर्ड प्रशासन कारवाई करीत नसल्याचे वृत्त दैनिक प्रभातच्या ऑनलाइन आवृतीला प्रसिध्द होताच बोर्डाने या विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र ही कारवाई आणखी तीव्र करावी व त्यात सातत्य असावे अशी मागणी खडकीकर नागरिक करीत आहेत.
खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अनेक दुकानदार, हातगाडीधारक छोटे मोठे व्यापारी या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. सोमवारी विजयादशमीनिमित्त अनेक व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीला आणले आहेत. मात्र ही फुले ग्राहकांना बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीतुन देण्यात येत होती.
बोर्डाने प्लॅस्टिक बंदीचे फलक खडकीमध्ये अनेक ठिकाणी लावलेले आहेत. मात्र या फलकाच्या खालीच हे विक्रेते प्लॅस्ट्किच्या पिशवीमधुन फुल विक्री करीत होते. खडकीमधील भाजी बाजाराच्या ठिकाणीही प्लॅस्टिकच्या पिशवीमधुनच वस्तु दिल्या जातात. तसेच, 80 किलो प्लास्टिक आणि 6000 रुपये दंड केला आणि अजून कारवाई केली जाईल असे खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक बी.एस.नाईक यांनी सांगितले आहे.