सलमान खानचे जीजू आणि अभिनेता आयुष शर्मा यांच्या “लवयात्री’ या डेब्यू चित्रपटाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. हा चित्रपट गतवर्षी 5 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या वर्षपूर्तीबाबत आयुष शर्मा याने सांगितले की, या चित्रपटाने मला अभिनेता आणि कलाकार म्हणून खूप काही शिकविले आहे.
आयुष शर्मा म्हणाला, या चित्रपटाला एक वर्ष झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला असून मी चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या चेह-यावरील त्यांच्या रिऍक्शन पाहत आहे, असे मला वाटत आहे. हा चित्रपट माझया कारकिर्दीतील पहिला चित्रपट असल्याने त्याबाबत एक विशेष आकर्षण आहे.
या चित्रपटातून अभिनेत्या म्हणून मला खूप काही शिकता आले. मला नाचता येत नव्हते, परंतु “लवयात्री’मुळे ते संभव झाले. या चित्रपटातील संगीत सर्वांनाच खूप आवडले होते. ते आजही प्रेक्षकांच्या मनात असून ते कायम चिर स्मरणात राहणार असल्याचे तो म्हणाला.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले होते. यात आयुष शर्मासोबत वरीना हुसेन झळकली होती. या चित्रपटाला सलमान खान याने प्रड्यूस केले होते. पण त्याला बॉक्स ऑफिसवर कथित यश मिळू शकले नाही.