शिंदे वासुली – चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील शिंदे वासुली, भांबोली, वराळे, सावरदरी व खालुंब्रे गावांमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अधिन चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे इंगळे नव्याने पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. चाकण एमआयडीसी व परिसरातील एकूण 22 गावांना महाळुंगे पोलीस ठाण्यात समाविष्ट केली आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अंतर्गत नवीन चौकी, स्वतंत्र पोलीस निरीक्षक, स्वतंत्र क्राईम व वाहतूक विभाग कार्यरत असल्याने वाढती गुन्हेगारी, गुंडगिरी, चोऱ्या-माऱ्या, दरोडे, लुटमार, अवैध प्रवासी वाहतूक व अवैध धंद्यांना पायबंद घातला जाईल; परंतु जसजसे औद्योगिकीकरण होत आहे तसतसे अवैध धंद्यांचे प्रमाणही वाढले आहेत.
चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे व वराळे या सहा गावांमध्ये प्रत्येकी किमान तीन ते चार हॉटेल्स अशी आहेत की त्याठिकाणी विनापरवाना खुलेआम देशी विदेशी दारू विक्री होते आहे. काही ठिकाणी छोट्या-छोट्या टपऱ्यांवरही खुलेआम ताडी व गावठी दारूधंदा जोमाने सुरू आहे. रस्त्यांलगत असणाऱ्या पान टपऱ्या, दुकानांमध्ये गुटखाबंदी असूनही सर्व प्रकारचा गुटखा राजरोसपणे व सहजपणे उपलब्ध असतो. भांबोली गावाच्या हद्दीतील वासुलीफाटा परिसरात तर अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. याठिकाणी काळे-पिवळे जुगार, मटका, विनापरवाना देशी विदेशी दारू व गुटखा विक्री सर्रास होताना दिसत असूनही पोलीस शांत कसे असा प्रश्न नागरिकांना
पडला आहे.
चाकण एमआयडीसी टप्पा दोनच नाही तर चाकण क्राईम युनिट 3 पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहोत. दैनंदिन कामकाज व गुन्ह्यांचा तपास करीत असताना अवैध धंद्यांविरुद्धच्या कारवाईला प्रथम प्राधान्य देऊन काम करीत आहोत. पुढील काही दिवसांत अवैध व्यावसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल व कायमचा बंदोबस्त केला जाईल.
– सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महाळुंगे