बीजिंग – चीनने जगातील सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे. डीएफ-४१ या अत्याधुनिक आंतरखंडीय (जगातील सर्व खंडांदरम्यान) असे त्याचे नाव आहे. हे एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र चीनमधून डागले असता, अमेरिकेवर केवळ ३० मिनिटांत हल्ला करू शकतील, एवढी याची प्रचंड क्षमता आहे, असे सामरिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्रीतील क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पाने म्हटले आहे
बीजिंगमध्ये राष्ट्रीय दिनाच्या परेडदरम्यान याचे अनावरण करण्यात आले.डीएफ-४१ या क्षेपणास्त्राचा पल्ला तब्बल ९ हजार ३२० मैलांचा (१५ हजार किलोमीटर) आहे. अशा प्रकारचे दुसरे क्षेपणास्त्र जगात नसल्याचे चीनमधील स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.या क्षेपणास्त्राद्वारे वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करणारी १० आण्विक स्फोटके वाहून नेणे शक्य आहे.
चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या स्थापनेनिमित्त राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या राजवटीच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित परेडवेळी डीएफ-४१ सह इतर नव्या लष्करी सामुग्रीचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते. सध्या चीनकडे जगातील सर्वांत मोठे लष्करी सामर्थ्य तर, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हवाई सामर्थ्य आहे.