पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – उद्योगांसह घरगुती, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने चाकण उपविभागाचे विभाजन केले आहे. नव्या रचनेत चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासुली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे.
याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण ३६ तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आले असून येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे कार्यालय सुरु होतील. महावितरणच्या राजगुरुनगर विभागामध्ये सध्या चाकण, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि राजगुरुनगर असे पाच उपविभाग आहेत.
यात चाकण उपविभाग अंतर्गत एकूण पाच शाखा कार्यालय आहेत. चाकण उपविभागातील १ लाख १३ हजार ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे ७ हजार ८०० उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत. महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
यामध्ये विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील प्रामुख्याने किंग्फा व ह्युंदाई २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन गेल्या डिसेंबरमध्ये एकाचवेळी कार्यान्वित करण्यात आले आहे.