पुणे – 2014 मध्ये भाजपने प्रा. मेधा कुलकर्णी आणि माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली होती. त्यांचे नाव “एम’ अक्षराने सुरू होते. तर, 2019 मध्ये पुन्हा भाजपने 2 महिलांना उमेदवारी दिली असून त्यांची नावेही “एम’ अक्षरानेच आहेत. त्यात यावेळी कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना, तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा “एम’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या दोन महिला विधानसभेत जाणार का, हे निवडणूक निकालच ठरविणार आहे.
दरम्यान नगरसेवक असलेल्या आणखी तीन नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाच्या आमदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागली आहे. 2014 मध्ये युती तुटल्याने भाजपच्या तिकिटावर महापालिकेतील दोन विद्यमान नगरसेवक लढले होते. त्यांनाही विधानसभेची लॉटरी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा तीन नगरसेवकांना पक्षाने संधी दिली आहे.
2014 मध्ये भाजपने नगरसेवक योगेश टिळेकर यांना हडपसरमधून, तर कोथरूडमधून प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, आता 2019 मध्ये महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले आठही मतदारसंघातील मताधिक्य पाहता हे तीनही नगरसेवक मुंबईवारी करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.