पुणे: भाजप सेनेची युती झाल्यानंतर पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले असून, कार्यकर्ते पुण्यातील सेना भवनाला टाळे ठोकून मातोश्रीवर जाऊन बसले आहेत.
तर कोथरूड मधून उमेदवारी जाहीर झालेले चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही जोरदार विरोध सुरू झाला आहे. आता मातोश्रीवर गेलेल्या शिवसैनिकांना पक्ष प्रमुख शांत करणार की, ते बंडखोरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. शिवाजीनगरची उमेदवारी सिद्धार्थ शिरोळेंना दिल्यामुळे या मतदार संघातून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यात शिवसेनेची अशी अवस्था असताना भाजपमधून देखील चंद्रकांत पाटील आणि शिरोळेंच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाजीनगरमधून शिरोळे यांना उमेदवारी जाहीर होताच काही भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल आहे.
आता सेना भाजपचे पक्षश्रेष्ठी या कार्यकर्त्यांना कसे शांत करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.