कझान : भारताने अमेरिकेचा 4-1 असा पराभव केला आणि कनिष्ठ गटाच्या जागतिक मिश्र अजिंक्यपद स्पर्धेतील साखळी गटात शानदार विजय मिळवित आव्हान राखले.
भारताकडून खेळताना गोव्याच्या तनिषा क्रॅस्ट्रोने मुलींच्या दुहेरीत तसेच मिश्र दुहेरीत विजय मिळविला. तिने इशान भटनागरच्या साथीत अमेरिकेच्या जेकब झांग व जेसिका वॉंग यांच्यावर 22-20, 21-9 असा विजय मिळवित भारतास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पाठोपाठ मईराबा लुवांगने मुलांच्या एकेरीत ऍलेक्झांडर झेंगला 21-9, 21-11 असे पराभूत करीत 2-0 अशी आघाडी मिळविली. मुलींच्या एकेरीत भारताच्या तस्निम मीर हिने नताली चेईवर 21-19, 25-23 असा निसटता विजय मिळविला आणि भारतास 3-0 असे अधिक्क्य मिळवून दिले. मात्र, नंतर भारताच्या मनजितसिंग व इमोन सोनोवाल यांना अमेरिकेच्या युई विल्यम व जोशुआ युआन यांनी 25-23, 21-19 असे हरवित सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु भारताच्या आदिती भट व क्रॅस्टो यांनी कॅटलिन निगे व इस्थेर शेई यांचा 21-16, 15-21, 21-7 असा पराभव केला आणि संघास 4-1 अशी विजयश्री मिळवून दिली.