मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपमध्ये आणखी मेगाभरती होणार आहे. काँग्रेसचे सहा आमदार आज मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये बुलडाण्यातील चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, राहुल बोंद्रे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. “भाजप पक्षात प्रवेश करणार नसून, मी कांग्रेस सोडणार नाही,” असे बोंद्रे यांनी सांगितले आहे.
भाजपमध्ये जाणाऱ्या या सहा आमदारांमध्ये सोलापूरमधील माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, मालाडमधील असलम शेख, शिरपूरमधील काशीराम पवार, साक्रीतील डी. एस. अहिरे, आणि पंढरपूरमधील भारत भालके यांचा समावेश असुन, हे आमदार अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजपप्रवेशाचे वृत्त राहुल बोंद्रे यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, “आज पुन्हा भाजप मेगा भरतीची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अनेक चॅनल्सला येत आहे. सदर बातमीत मी पण भाजपमध्ये जाणार असे सांगण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा मी स्पष्टपणे भूमिका मांडून सांगत आहे की मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, मी कांग्रेस सोडणार नाही. कांग्रेस पक्ष बुलढाणा जिल्ह्यात ज्याला उमेदवारी देईल त्यांचे काम संपूर्ण शक्तीनिशी करेल, असे बोंद्र यांनी म्हटले आहे.