14 जिल्ह्यांत वृक्षलागवड उद्दिष्टाची “शंभरी’

पुणे – वनमहोत्सवांतर्गत यंदा सर्वत्र विक्रमी वृक्षलागवड झाली असून, परभणी जिल्हा वगळता राज्यात सर्वत्र वृक्षलागवडीला विक्रमी प्रतिसाद मिळाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील 14 जिल्ह्यांनी उद्दिष्टाची शंभरी गाठली असून, वनविभाग आणि वनेत्तर विभागांकडून सर्वाधिक लागवड झाली असल्याचे वनविभागाच्या माहितीतून समोर आले आहे.

राज्य सरकारच्या वनमहोत्सव उपक्रमांतर्गत यंदा राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक वनमंत्रालयातर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी वृक्ष लागवडीचे ठराविक उद्दिष्ट निश्‍चित केले होते. जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांत ही वृक्षलागवड करणे अनिवार्य होते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय विभाग, नागरिक आणि स्वयंसेवी संघटना यांच्याकडून ही वृक्षलागवड करण्यात येते. यंदा राज्यातील नांदेड, बीड, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली अशा 14 जिल्ह्यांमध्ये 100 टक्‍क्‍यांहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली आहे. तर इतर ठिकाणी सुमारे 90 टक्‍क्‍यांपर्यंत वृक्षलागवड करण्यात आली आहे.

मात्र, एकीकडे वृक्षलागवडीची ही घोडदौड सुरू असताना, परभणी जिल्हा मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अजूनही मागेच राहिला आहे. याठिकाणी नियोजित उद्दिष्टाच्या केवळ 72 टक्‍के इतकीच वृक्षलागवड झाली असल्याचे वनविभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. यामागील कारणांबाबत विभागाकडून अभ्यास केला जात असून, त्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात एकूण 91.23 टक्‍के इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, विभागाला देण्यात आलेल्या 1 कोटी 52 लाख 36 हजार 800 पैकी 1 कोटी 38 लाख 68 हजार 998 इतकी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
पूरस्थितीतही वृक्षलागवड जोमाने

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू असलेल्या वनमहोत्सवादरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्‌भवली होती. मात्र, परिस्थितीचा वृक्षलागवडीवर कोणताही परिणाम झाला नाही. याऊलट पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रत्नागिरी, सांगली, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये 100 टक्‍के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचे वनविभागाच्या माहितीतून समोर आले आहे. त्यामुळेच यंदाचा वनमहोत्सव हा अतिशय उत्साही वनमहोत्सव ठरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.