फेसबुकचे 21 लाखांचे शेअर्सही निवास व्यवस्थेसह अन्य लाभ मिळणार
पुणे – मूळची जालन्याची असलेली आणि पुण्यातून अभियांत्रिकीची पदवी मिळवलेल्या रश्मी देशमुख (पूर्वाश्रमीची रश्मी देशपांडे) या युवतीला फेसबुक या सोशल मीडिया साईटकडून भल्या मोठ्या वेतनावर नोकरीची संधी मिळाली असून आता ती लवकरच आयर्लंडमध्ये फेसबुकच्या कार्यालयात रुजू होणार आहे. तब्बल 80 लाखांचे पॅकेज रश्मीला मिळाले असून तिची आयर्लंडमधील निवास व्यवस्थाही कंपनीकडूनच देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर तिला फेसबुकचे 21 लाखांचे समभागही (शेअर्स) देण्यात आले आहेत.
दै. “प्रभात’चे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र देशमुख यांचे चिरंजीव मयूर यांची रश्मी ही पत्नी असून, तिच्या निवडीबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जुलै महिन्यामध्ये फेसबुककडून त्यांच्या आयर्लंड कार्यालयासाठी अधिकारी भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात भारतातही विविध ठिकाणी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या.
देशभरातून हजारो युवक-युवतींनी या भरती प्रक्रियेत भाग घेतला. पाच तांत्रिक, दोन अतांत्रिक आणि एक व्यक्तिमत्त्व विकास चाचणी अशा कठीण निवड प्रक्रियेतून फेसबुकने भारतातून फक्त रश्मी देशमुख या एकमेव तरुणीची निवड केली आणि तिला तब्बल 80 लाखांचे पॅकेज देऊ केले. आता नोव्हेंबर महिन्यापासून रश्मी फेसबुकच्या आयर्लंडमधील कार्यालयात आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील.
31 वर्षीय रश्मीचे आई-वडील शिक्षक असून तिने जालना येथील श्री. म. स्था. जैन विद्यालयातून माध्यमिक तर जे. ई. एस. महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. नंतर पुणे विद्यापीठातून तिने बी. ई. ची पदवी प्राप्त केली. स्वीडन, फिनलंड, फ्रान्स आणि अमेरिकेत काही काळ नोकरी केल्यानंतर तिला फेसबुकमधील संधीविषयी समजले. या निवड प्रक्रियेतून निवड झालेली ती भारतातली एकमेव तरुणी ठरली आहे.
चार वर्षांपूर्वी माझा विवाह झाला आणि रश्मी देशपांडेची मी रश्मी देशमुख झाले. विवाह झाल्यानंतरही माझ्या सासरच्या सर्वच मंडळींनी माझ्या करिअरला पाठिंबाच दिला. अशीच मनोवृत्ती आजच्या माता-पिता, सासू-सासऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे, असे मला सांगावेसे वाटते. तुमची मुलगी अथवा सून हुशार असेल, तर तिला नवनवी शिखरे पादाक्रांत करण्यास प्रोत्साहन द्या. ती दोन्ही घराण्यांचे नाव आकाशावर लिहिल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीचं आयुष्य म्हणजे चूल आणि मूल या पारंपरिक संकल्पनेतून बाहेर येणं, हीच आजची गरज आहे.
– रश्मी देशमुख