गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात शिर्डी विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण, याची चर्चा सध्या झडत आहे. कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे, कन्या शरयू देशमुख, बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे अरुण कडू, डॉ. एकनाथ गोंदकर या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यापैकी कोण हे काही स्पष्ट होत नाही.
विखे पाटील यांचे विरोधक समजले जाणारे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भाजपच्या चिन्हावर राहाता नगरपालिका सत्ता मिळविल्याने ते भाजपविरोधात बंड करणार नाहीत, अशी चर्चा आहे. राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. सुजय विखे हे भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे कुटुंबीयांचे राजकीय समीकरण जुळले आहे. शिर्डी मतदारसंघाची जागा ही शिवसेनेकडे आहे; पण, आजपर्यंत विखे ज्या पक्षाकडून निवडणूक लढले, ते विक्रमी मतांनी विजयी झाले. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या विरोधात असलेला उमेदवार हा कॉंग्रेस पक्षाचा राहणारा आहे. अद्याप सेना-भाजपची युती झाली नाही. कॉंग्रेसचा उमेदवार देण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. ते कोणाला उमेदवारी देतात, याकडे लक्ष लागले आहे.