महाराष्ट्राच्या सिकंदर शेखची ९२ किलो गटात विजयी सलामी
कोपरगाव (प्रतिनिधी) – देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो मल्लांनी आपल्या कुस्तीचे डाव प्रतिडाव टाकुण एकमेकांना चितपट करीत होते. यावेळी कुस्तीप्रेमींनी कुस्तीचा आनंद घेतला. शिर्डीच्या साईबाबा नगरीमध्ये २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राहता तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले असून, कुस्ती स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष व उत्तरप्रदेशचे खासदार ब्रिजभूषण चरणसिंग, उपाध्यक्ष हरिष कदम राज्य कुस्तीविर, परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार उद्योगपती गणेश घुले, राष्ट्रीय पंच सुनिल लिमन, सुनिल शेटे, मारुती घोरपडे, राहता तालीम संघाचे अध्यक्ष रविंद्र वाघ, पै. शिवाजीराजे चौधरी, पै.ज्ञानेश्वर मांगडे, सचिन चौगुले, मदन मोकाटे, बबलू धुमाळ हे उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी या ऐतिहासिक कुस्ती आखाड्याची सुरूवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
देशातील २६ राज्यातील २८ कुस्ती संघ या ठिकाणी आले असून तब्बल ८२० मल्लांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये २५० महीला मल्लांचा सामावेश आहे. प्रत्येक राज्यातील एका संघात ३० मल्ल असुन त्यापैकी १० महीला मल्ल आहेत. तर रेल्वे व आर्मी या दोन संघाचा या आखाड्यात सहभाग असल्याने कुस्तीची ही दंगल लक्षवेधी ठरत आहे. ५० पेक्षा ज्यास्त पंच, प्रशिक्षक, कुस्ती व्यवस्थापक यांचा या कुस्ती स्पर्धेत आपली भुमीका बजावत आहेत.
विविध किलो वजनाच्या १० गटातुन मॅटवरच्या कुस्तीची ही स्पर्धा तिन दिवस चालणार आहेत. फ्रि स्टाईल कुस्ती गटात ५७ किलो पासुन ते १२५ किलो वजन गटातील मल्लांची कुस्ती लावण्यात आली तसेच, गिरक्रोमन स्टाईलमधुन ५५ किलो वजन गटापासुन ते १३० किलो वजन गटाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. मुलींमध्ये ५० किलो वजन गट ते ७६ किलो वजन गटात कुस्त्यांची रंगत बघण्यासाठी परिसरातील कुस्तीप्रेमींनी गर्दी केली आहे. देशभरातुन आलेल्या कुस्ती पटू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक मान्यवर यांची राहण्या खाण्याची व्यवस्था राहता कुस्ती तालीम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तर आत्मामालीक कुस्ती केंद्राच्या वतीने कुस्ती मॅट देण्यात आली आहे.
तसेच सांगली आणि सातारा आदी परिसरातील मल्लांची निवासाची व भोजणाची व्यवस्था आत्मामालीक संकुलात करण्यात आली आहे. दरम्यान या कुस्ती स्पर्धामधून तिन विजेत्या मल्लाची निवड करण्यात येईल ३ पुरूष आणि ३ महीला विजेत्या मल्लांना सन्मान चिन्ह व प्रशिस्ती पत्रक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच हंगेरिया या देशात होणाऱ्या वल्ड चॅम्पीयन शिप स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. २८ आॅक्टोबर रोजी निवड झालेल्या मल्लांना विदेशात स्पर्धेसाठी रवाना केले जाणार आहे.
दरम्यान शिर्डी येथील ३ दिवशीय २३ वर्षा खालील ज्यूनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पहील्या दिवशी फ्रीस्टाईल मधील १० वयोगटातील मल्लांच्या कुस्त्यांच्या स्पर्धा झाल्या. यात पहील्या ५७ किलो वजन गटातून महाराष्ट्राचा आबासाहेब आटकळे ६१ कीलो वजन गटात सुरज कोकाटे, यांनी दोन हेरा मधून विजय सलामी देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला. कुस्त्याच्या आखाड्यातून कुस्तीचे समालोचन करण्यात प्रसिध्द असलेले शंकर पुजारी यांच्या समालोचनाने शिर्डी नगरीसह उपस्थितांचे लक्ष वेधत होते.