पद्मावती देवी मंदिर परिसरातील स्थिती
आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीतून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पद्मावती देवी मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी जात असतात. नवरात्र उत्सवात तब्बल पंधरा दिवस या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते. या मंदिराकडे जाणारा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत येणारा रस्ता दुर्लक्षित राहिल्याने या रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील खाचखळगे पाण्याने भरले आहेत.
पद्मावती देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात चार दिवसांपूर्वी येथील एक सामाजिक कार्यकर्ते निसार सय्यद अहमद यांनी सुमारे 200 महिला, पुरुष नागरिकांसह आळंदी पालिकेवर धडक मोर्चा नेला होता. परंतु, पालिकेने काहीच ठोस पावले उचलली नसून रस्ता जैसे थे आहे. यात राजकारण आहे की काय? अशी चर्चा आहे. याबाबत पालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, असे सय्यद यांनी सांगितले. येथील नगरसेवक देखील या गोष्टीकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. यंदाच्या नवरात्र उत्सवात देखील चिखल तुडवीतच देवीच्या दर्शनासाठी जायचे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदरील रस्ता घटस्थापनेची पूर्वी दुरुस्त न केल्यास मरकळ चौकात सनदशीर मार्गाने रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सय्यद यांनी दिला आहे.