जामखेड – पंचायत समितीच्या उपसभापती राजश्रीताई मोरे यांचे पती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत (नाना) मोरे यांनी भाजपला राजीनामा दिला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोरे हे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक होते, त्यांच्या विरोधात मोरेंनी बंड पुकारून भाजपला रामराम ठोकला आहे.
दरम्यान, २००९ व २०१४ च्या निवडणुकांमध्ये राम शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या निवडणुकांमध्ये मोरे यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमांना मोरे अनुपस्थित राहत होते. त्यामुळे पक्षावर त्यांची नाराजी असल्याचे स्पष्ट दिसून आले होते, आज अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
या पत्रकार परिषदेत त्यांनी पालकमंत्री प्रा राम शिंदे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कडाडून टीका केली. तसेच येत्या 23 तारखेला कर्जतमध्ये अजित पवार, आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहिर केला.