आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
सांगली : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे राज्यात जोरात वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. नुकतेच हर्षवर्धन पाटलांनी हाती कमळ घेतले. यानंतर आता कॉंग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनीही शरद पवारांवर टीका करत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सत्यजित देशमुख आज महाजनादेश यात्रेदरम्यान कराडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असून त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे.
सत्यजीत देशमुख यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देताना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीची शकलं उडायली लागली. पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले, अशा शब्दांत सत्यजित देशमुख यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे, आघाडीमध्ये शिराळा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळण्याची शक्यता धूसर असल्याने सत्यजित देशमुख काही दिवसांपासून दुसऱ्या पर्यायाच्या शोधात होते. सत्यजित देशमुख यांनी शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा घेतला. त्यात त्यांनी आपला भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात येत असून यावेळी देशमुख मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.