उंब्रज – वराडे, ता. कराड येथे कृष्णा नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. या यवकाचा खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तळबीड पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, वराडे, ता. कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात कडेला बाभळीच्या झाडाला अडकलेले एक पोते काठावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास दिसले. पोत्यातून दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांनी वराडेचे पोलीस पाटील सुदाम शिरसट यांना कळवले. शिरसट यांनी या घटनेची तळबीड पोलीस ठाण्यात देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीपात्रातून पोते बाहेर काढले. पोत्यातून अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. परिसरात मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हे पोते नदीतून वाहत वराडे हद्दीपर्यंत आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित युवकाचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.